कोकणवासीयांचे स्वप्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे जिल्हय़ातील काम जवळपास 80 टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे. खारेपाटण ते झारापपर्यंत करण्यात आलेल्या चौपदरी रस्ताकामात काही किरकोळ कामे शिल्लक राहिल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून सांगण्यात आले. खारेपाटण ते कलमठ व कलमठ ते झाराप असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. यातील खारेपाटण ते कलमठ या भागातील बहुतांश काम झाले आहे. येत्या पावसाळ्य़ापूर्वी जिल्हय़ातील महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून चौपदरी रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणकडून देण्यात आली.
रत्नागिरी जिल्हय़ाच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीने करण्यात आले. खारेपाटण ते झारापपर्यंतचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. खारेपाटण ते कलमठपर्यंत कामाचा ठेका केसीसी बिल्डकॉनकडे देण्यात आला आहे. या ठेकेदार कंपनीकडे एकूण 33 किमीचे चौपदरीकरण काम देण्यात आले. त्यातील सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले. या टप्प्यात येणारी तळेरे, कासार्डे व नांदगाव येथे असलेली फ्लाय ओव्हर ब्रिजची कामे पूर्ण व्हायची आहेत. या टप्प्यात 24 किमी सिमेंटच्या, तर 9 किमी डांबरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
जानवलीतील काम महिन्याभरात पूर्ण
खारेपाटण ते कलमठ टप्प्यात काही ठिकाणी भू संपादनाचे काम पूर्णत्वास गेलेले नसल्याने त्या ठिकाणची कामे प्रलंबित राहिली आहेत. या मिसिंग प्लॉटमध्ये 8 ते 10 जागांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. नडगिवे, वारगाव, हुंबरटमध्ये मिसिंग प्लॉट राहिले असून दुसऱया टप्प्यातील निवाडय़ात या जागांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणकडून देण्यात आली. खारेपाटण ते हुंबरटपर्यंतच्या भागात रस्त्यावर दिशादर्शक पट्टे मारण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जानवली भागात हायवेचे काम उशिराने सुरू करण्यात आले. वन जमिनीमुळे या कामाला विलंब झाला होता. मात्र, तेथील काम महिन्याभरात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
पिंगुळीत दोन टर्मिनस
कलमठ ते झारापपर्यंत दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीमार्फत 44.900 किमी चौपदरी रस्त्याचे काम करण्यात आले. या टप्प्यातील एकूण रस्त्याच्या कामातील जवळपास 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून सांगण्यात आले. या टप्प्यात अपूर्ण असलेल्या कामांमध्ये कसाल, जानवली पूल, महामार्गाला मिळणारे जोडरस्ते, जंक्शन, शहरातील गटारांचे बांधकाम, रस्त्यांचे दिशादर्शक पट्टे आदी कामे शिल्लक आहेत. कलमठ ते झारापपर्यंत पिंगुळीत 2 टर्मिनस असणार आहेत. या टर्मिनसच्या ठिकाणी लांब पल्ल्यांच्या वाहनांना थांबण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. येथे शौचालय, वॉश बेसीन व दूरध्वनीची व्यवस्थाही असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ओसरगाव येथील टोल नाक्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचारांची सुविधा असणार आहे. महामार्ग पोलिसांचे कार्यालय या टोलनाक्याच्या ठिकाणी असणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून सांगण्यात आले.
काँक्रिटचा रस्ता अंतिम
कलमठ ते झारापपर्यंत डांबरी रस्त्यावर कारपेटचे काम करण्यात आले होते. मात्र, त्यावर आता पुन्हा एक डांबरीकरणाचा बीसी लेअर टाकण्यात आला आहे. मात्र, काँक्रिट रस्त्यावर नवीन लेअर येणार नसून सध्या अस्तित्वात आलेला रस्ताच अंतिम असल्याचे महामार्ग प्राधिकरणने स्पष्ट केले. कलमठ ते झारापपर्यंत मिसिंग प्लॉट दुसऱया निवाडय़ात घेण्यात आले आहेत. त्यामुळे त्या निवाडय़ाला मंजुरी मिळाली, की मोबदला दिल्यानंतर ती जमीन ताब्यात आल्यानंतर तेथील काम सुरू होणार आहे.
कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिज मेपर्यंत पूर्ण
कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिजचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. यातील 10 पिलरवरील स्लॅब पूर्ण झाले आहेत. एकूण 13 पिलरला स्ट्रक्चर उभारणी करण्यात आली आहे. या फ्लाय ओव्हर ब्रिजला 43 पिलर असून उर्वरित पिलरवरील स्लॅब पूर्ण झाले, की पुलावरील रस्त्याचा काँक्रिटचा एक लेअर टाकण्यात येणार आहे. एस. एम. हायस्कूल व न्यायालयासमोरील बॉक्सेलची भिंत पूर्ण झाल्यानंतर फ्लाय ओव्हर ब्रिजचा रस्ता या बॉक्सेलला जोडण्यात येणार आहे. गांगो मंदिर व एस. एम. हायस्कूलसमोरील अंडरपासचे कामही येत्या महिन्याभरात पूर्ण होणार आहे.
फ्लाय ओव्हर ब्रिजवरून लोड टेस्ट घेणार
फ्लाय ओव्हर ब्रिज पूर्ण झाले, तरी त्या पुलावरून लोड टेस्ट घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हे पूल वाहतूकीला खुले होणार आहे. फ्लाय ओव्हर ब्रिजचे काम ज्या ठिकाणी पूर्ण होणार तेथील पुलाखालील भाग मोकळा करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहने पार्किंगचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लावण्यात येणार आहे. गोकुळधाम हॉटेलसमोर नाल्याचे बांधकाम अर्धवट करण्यात आले असून उर्वरित जुन्या मोरीचे पाईप काढून त्या ठिकाणी बॉक्सेल नाल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. कलमठ ते झारापपर्यंतच्या टप्प्यात काँक्रिटचा रस्ता 29.61 किमी, तर डांबरी रस्ता 11.58 किमी आहे. काँक्रिट व डांबरी रस्ता मिळून एकूण 41.19 किमी आहे. एकूण 44 किमी रस्त्यात फ्लाय ओव्हर ब्रिज, अंडरपास, पुलावरील रस्त्याचा भाग हा त्या-त्यावेळी करण्यात येणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून सांगण्यात आले.
टायरचे तापमान मेंटेनसाठी डांबरी रस्ता
खारेपाटण ते झारापपर्यंत एकूण केलेल्या चौपदरी रस्त्यात काही भागात डांबरी रस्ता करण्यात आला आहे. मुंबई ते गोवा अशी वाहतूक करणाऱया वाहनांच्या टायरचे तापमान मेंटेन राखण्यासाठी रस्त्याचा काही भाग डांबरी करण्यात आल्याचे महामार्ग प्राधिकरणकडून सांगण्यात आले. काँक्रिट रस्त्यावर टायरचे तापमान वाढत असल्याने ते तापमान डांबरी रस्त्यावर वाहन आले, की मेंटेन होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.