माडखोल धरणात पोहायला गेलेले दोन युवक अडकले

0
94

सिंधुदुर्ग – सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरणावर पोहण्यासाठी गेलेला कारिवडे येथील घाडी नामक युवक व तो बुडताना त्याला वाचविण्यासाठी गेलेला गोविंद शेटकर नामक स्थानिक युवक प्रवाहातून वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेलेले हे दोघेही युवक खोल पाण्यात जाऊन अडकले. याबाबतची माहिती स्थानिक युवकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या दोन्ही युवकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत त्यांना जिवदान दिले.

कारिवडे येथील घाडी नामक युवक शनिवारी दुपारी माडखोल येथील धरण परिसरात फिरायला गेला होता. धरणाच्या ओव्हरफ्लो च्या बाजूला असलेल्या सिमेंट बंधाऱ्यालगत पोहत असताना अचानकपणे तो बुडत असल्याचे पाहून तेथेच जवळ असलेल्या एका गोविंद शेटकर नामक युवकाने उडी घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाहाच्या पाण्याबरोबर तोही वाहून गेला. याबाबतची माहिती सावंतवाडी तहसील कार्यालयाच्या आपत्कालीन कक्षाला मिळाल्यानंतर तहसील कार्यालयाकडून माजी सभापती प्रमोद सावंत यांना फोन करण्यात आला. मात्र यावेळी ते बाहेर असल्याने त्यांनी आपला भाऊ प्रशांत सावंत यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर प्रशांत सावंत यांच्यासह इतर स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेत त्या दोन्ही युवकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने त्यांना बाहेर काढणे फारच जिकिरीचे बनले होते मात्र या युवकांनी दोरखंडाच्या सहाय्याने स्वतःचा जीव धोक्यात घालत अगदी प्रवाहात जाऊन त्यांना जिवदान दिले. या बचाव कार्यात प्रशांत सावंत यांच्यासह स्थानिक युवक जीवन केसरकर, सुनील केसरकर, कृष्णा राऊळ, शेखर लातये, शुभम केसरकर, आप्पा राऊळ यांनी सहभाग घेतला होता. माडखोल सरपंच संजय शिरसाट यांनीही घटनास्थळी दाखल होत मदत कार्यात सहभाग घेतला होता.

दरम्यान, माडखोल धरणात युवक पुढार्‍याची माहिती मिळताच पोलिसांनी रेस्क्यू किट सह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस आल्याचे कळताच जीवदान देऊन बाहेर काढलेल्या कारिवडेतील घाडी नामक सदर युवकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस हवालदार भूषण भुवर, सखाराम भोई, सुनील नाईक, होमगार्ड गणेशप्रसाद वेंगुर्लेकर यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, ते पोहोचण्याआधीच सदर युवकाने पलायन केले. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. दरम्यान, सदर धरणाकडे जाणारा रस्ता बंद करून त्याबाबतचा फलक ग्रामपंचायतने लावावा, अशा सूचना पोलिसांनी ग्रामपंचायतला केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here