सिंधुदुर्ग – कोरोनामुळे लोकजीवन जागच्या जागी थांबले आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून लोकलसह लांब पल्ल्याची रेल्वेसेवाही थांबविण्यात आली. मात्र, आता लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुरू करण्यात आल्यामुळे मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावरून मंगला आणि नेत्रावती एक्सप्रेस या दोन गाडय़ा धावल्या. परंतु या गाडय़ांनी राज्यातील राज्यात किंवा सिंधुदुर्गातून गोवा प्रवास करण्यास बंदी असल्याने या गाडय़ांची आधीच बूकिंग केलेल्या मुंबईला आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरूनच माघारी परतावे लागले.
या संदर्भात कोकण रेल्वेशी संपर्क साधला असता, लांब पल्ल्याच्या काही गाडय़ांची वाहतूक 1 जूनपासून सुरू करण्यात आली आहे. त्यातून प्रवास करण्यासंदर्भात काही अटीही घालण्यात आल्या आहेत. त्याबाबतची माहिती रेल्वे व्यवस्थापनाकडून वारंवार देण्यात आलीही आहे. लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा गैरसमजही होऊ नये म्हणून या संदर्भात वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले. परंतु प्रवाशांनी याबाबतची जागरुकता न दाखविल्यानेच त्यांना मंगला आणि नेत्रावती एक्सप्रेसने मुंबई किंवा महाराष्ट्रातील इतर भागात जाण्याचा प्रवास करता आला नाही. त्यामुळेच त्यांना रेल्वे स्टेशनवरून माघारी परतावे लागले असल्याचे कोकण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, तब्बल अडिच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 2 जूनपासून कोकण रेल्वे मार्गावरून मंगला आणि नेत्रावती एक्सप्रेस या दोन गाडय़ा धावल्या. यात कणकवली रेल्वे स्टेशनला थांबा असल्याने तिथून मंगला एक्सप्रेसमधून दहा आणि कुडाळ स्टेशनला थांबा असल्याने नेत्रावती एक्सप्रेसमधून सात प्रवाशांचे आगमन झाले. यावेळी कोकण रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन करून आलेल्या सर्व प्रवाशांना त्यांच्या गावच्या सरपंचांच्या स्वाधीन केले. जिल्हय़ाबाहेरून आलेल्या व्यक्तींना तुमचे स्वतःचे घर असेल व स्वतंत्र शौचालय-स्वच्छतागृह असेल, तर तुम्ही गृह विलगीकरणात राहू शकता. अन्यथा संस्थात्मक विलगीकरणात राहू शकता, असे त्यांना निर्देश दिले.
तब्बल अडिच महिन्यानंतर लांब पल्ल्याच्या देशभर अंशतः रेल्वे वाहतूक सुरू झाली. याच्या बातम्या विविध माध्यमातून आल्यामुळे अनेकांचा रेल्वे वाहतूक नियमित सुरू झाल्याचा समज झाला. त्यामुळे राज्यांतर्गत रेल्वेने वाहतूक करण्यासाठी मंगळवारी सिंधुदुर्गातील रेल्वे प्रवाशांनी स्थानकावर धाव घेतली. मात्र, राज्यांतर्गत कोणतीही रेल्वे सेवा अद्याप उपलब्ध झालेली नसून 30 जूनच्या लॉकडाऊननंतर या संदर्भात निर्णय होईल. तोपर्यंत रेल्वे प्रवासाचे नियम प्रवाशांनी जाणून घ्यावेत, असे आवाहन रेल्वे व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही व्यक्तीला त्याच स्टेशनवर टेनमध्ये बसावे लागणार आहे. प्रवास करणाऱया व्यक्तीजवळ अँड्रॉईड फोन असणे आवश्यक असून आरोग्य सेतू ऍप प्रत्येकाजवळ असणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित व्यक्तीला प्रवास करण्यापासून वंचित राहवे लागणार आहे, असेही माघारी परतलेल्या या रेल्वे प्रवाशांना सांगण्यात आले.