निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन मधील दिवे आगार समुद्र किनाऱ्यावर धडकल्याने कोकण किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्याना मोठा फटका बसला. रायगडमधील दोघांचा मृत्यू व एकजण जखमी झाला असून वादळात रत्नागिरीतील पाच जण जखमी झाले आहेत. रत्नागिरीत भरकटलेल्या जहाजावरील १३ खलाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले. तर वीजवाहिन्या तुटल्याने काही काळ पुरवठा खंडित झाला होता. वादळानंतर येथील पाऊस थांबला असून जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.
या वादळाचा मोठा फटका बसला तो रायगडला. जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ वाघमारे (५८) महावितरणचा पोल पडून, तर श्रीवर्धन मध्ये भिंत पडून एक असे दोन जणांचा मृत्यू झाला. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा, पनवेल, उरण तालुक्यात खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. वादळाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या घरात राहणार्या सुमारे १५ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यामुळे जीवित हानी टळली.
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला. वादळात झाडे कोसळून पाच जण जखमी झाले. मिरजोळे येथील एका घरावर झाड पडून तिन जण जखमी झाले. उंडी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच पूर्णगड येथील एका घरावर झाड कोसळल्यामुळे एक जण जखमी झाला आहे. नाणीज येथील रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक काही काळ बंद होती. जिल्ह्यात दापोली तालुक्यातील जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदार शेतकऱ्याचंही मोठे नुकसान झाले आहे. बर्वे यांची जवळपास ५०० पोफळीची झाडे, २०आंबा कलमे, नारळ २०, फणसाची ३० झाडे उन्मळून पडली आहेत. विशेष म्हणजे आंब्याची झाडे तर ५० ते ६० वर्षांची होती.
कोकणातील तिन्ही जिल्ह्यात वादळाचा प्रभाव जाणवला असून आंबा, काजू, माड बागायतीचेहि मोठे नुकसान झाले आहे, किनारी भागातील घरांची छप्परे उडून नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनाम्याला सुरवात केली आहे. वादळादरम्यान २४ तासांत कोकणात ७१.८७ मि. मी च्या सरासरीने पाऊस पडला.
त्या सर्व खलाशांना क्वारंटाईन करणार – मंत्री उदय सामंत
रत्नागिरीत भरकटलेल्या जहाजावरील सर्व १३ खलाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. डिझेल वाहून नेणारं हे जहाज दुबईवरुन मुंबई-जयगड नंतर कारवारला गेलं. कारवारला डिझेल खाली करुन हे जहाज परतीच्या मार्गाला लागलं होतं. मात्र, समुद्रात निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाची सूचना मिळाल्यानंतर हे जहाज रत्नागिरीतल्या भगवती ब्रेकवॉटरजवळ आश्रयाला आले होते. जहाजावरील खलाशांना स्थानिक प्रशान आणि ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं आहे. यातील १० खलाशी हे भारतीय तर ३ खलाशी परदेशी आहेत. या सर्व खलाशांची स्वॅब टेस्ट करून क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.