नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात निदर्शने महाविकास आघाडीकडून निदर्शने; केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात घोषणाबाजी

0
139

 

सिंधुदुर्ग – कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महा विकास आघाडीच्या वतीने आज सिंधुदुर्गात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सावंतवाडी येथील गांधी चौकातही जोरदार आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आदींसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमितसामंत म्हणाले, मलिक यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर ईडी कडून झालेली कारवाई चुकीच्या पद्धतीने आहे. त्यामुळे ईडीचा धाक दाखवून दडपशाहीने राजकारण करणाऱ्या केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी म्हणाले, मलिक यांच्यावर झालेली कारवाई दबाव टाकण्यासाठी आहे. केंद्रातील मोदी सरकार हिटलरशाही ने आपला कारभार हाकत आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या इडीचा कारवाया या भाजप प्रवेशाचे एक निमंत्रण आहे. आतापर्यंत अनेकांनी ईडीला घाबरून भाजपात प्रवेश केला. मात्र आमचे खंबीर नेते या कारवायांना घाबरणार नाही. आम्ही कायदेशीर लढा देऊ, असा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे म्हणाले, अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम ईडीने केले आहे. ईडीकडून होत असलेल्या कारवाया ही भाजप सरकारची एक खेळी आहे. विरोधी पक्षातील नेते भाजपात येण्यासाठी त्यांना इडीचा धाक दाखवायचा आणि आपल्या जाळ्यात खेचून घ्यायचे, हे त्यांचे यामागचे राजकारण आहे. आतापर्यंत अनेक नेते ईडीला घाबरून त्यांच्या गळालाही लागले आहेत. मात्र जे खंबीरपणे लढत आहेत. त्यांच्यावर दडपशाही टाकून अशी चुकीच्या पद्धतीने कारवाई करणे हे मलिक यांच्या अटकेनंतर पुन्हा समोर आले आहे.

याप्रसंगी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, केंद्र सरकारचा कारभार म्हणजे अघोषित आणीबाणी आहे. त्यामुळे दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आता नागरिकांनी सज्ज व्हावे. केंद्र सरकारच्या विरोधात वाज उठवणार्‍या विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्याकडून ईडीचा धाक दाखविला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी कोण कसा लढा उभारेल ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. जसा गांधीजींनी स्वातंत्र्याचा लढा दिला, तोच लढा आता पुन्हा नागरिकांनी उभा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here