धक्कादायक – कणकवली तालुक्यात संस्था विलगीकरणात 48 पैकी 40 ‘रेड झोन’मधील 

0
86

 

एकिकडे शासनाकडून रेड झोनमधून येण्यास परवानगी मिळणार नाही, असे सांगितले जात असले, तरीही रेड झोनमधूनही दाखल होणाऱयांची संख्या लक्षणीय असल्याचे पुढे आले आहे. तालुक्यात सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्ड व संस्था विलगीकरणात दाखल असलेल्या 48 जणांपैकी तब्बल 40 जण रेड झोनमधूनच आले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे रेड झोनमधून लोक येत राहिले, तर जिल्हय़ासाठी ते धोकादायक ठरण्याची शक्यता असून या साऱयाला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पास वा विनापास तालुक्यात आल्यानंतर होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या 761 आहे. यापैकी 473 जणांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. तरीही आजही तालुक्यात 288 जण होम क्वारंटाईन आहेत. ही सर्वमंडळी जिल्हय़ाच्या बाहेरून आलेली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यात सद्यस्थितीत संस्था विलगीकरण कक्षात दाखल असलेले 33 जण आहेत. यापैकी तब्बल 27 जण रेडझोनमधून आलेले आहेत. तर ओरोस येथील आयसोलेशनमध्ये 15 जण दाखल असून यातील 13 जण रेडझोनमधील आहेत. संस्था विलगीकरणात दाखल करण्यात आलेल्यांपैकी सहाव्या दिवशी स्वॅब घेण्यासाठी ज्यांना ओरोसला नेण्यात येते, त्यांना टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आतापर्यंत होम क्वारंटाईन केले जात होते. मात्र, रेड झोनमधून आलेल्यांना आता 14 दिवसापर्यंत संस्था विलगीकरण कक्षातच ठेवण्यात येणार आहे.

कर्मचाऱयांना नोंदणीबाबतचे प्रशिक्षणही

मात्र, एकीकडे रेडझोनमधून कुणालाही येता येणार नसल्याचे सांगितले जात असले, तरीही प्रत्यक्षात रेडझोनमधून अनेकजण दाखल होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता चेकपोस्टवर आरोग्य विभागाकडून येणाऱयांच्या नोंदणीसाठी आरोग्य कर्मचारीही तैनात ठेवण्यात येणार असून त्यांना नोंदणीबाबतचे प्रशिक्षणही नुकतेच देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here