अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात बुधवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ‘सीबीआय’ला ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतवाढ २१ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल न केल्यास भावेला जामीन मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘सीबीआय’ने एक दिवस आधी दोषारोपपत्र दाखल केले आहे. भावेचा जामीन अर्ज यापूर्वी कोर्टाने फेटाळला आहे. संजीव पुनाळेकर याला यापूर्वी जमीन देण्यात आला आहे. पुनाळेकर याने दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिले; तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे, असा दावा ‘सीबीआय’ने केला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल
