महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील पौष पौर्णिमेच्या पारंपरिक गाढव बाजारात तब्बल तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. गावठी गाढवाला आठ ते वीस हजार रुपये, तर काठेवाडी गाढवाला २५ ते ४० हजार रुपये भाव मिळाला. गेल्या चार दिवसांपासून जेजुरीच्या बंगाली पटांगणात गाढव बाजार भरला असून बाजारात दीड हजार गाढवांची खरेदी-विक्री झाली आहे.
महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून व्यापारी या ठिकाणी आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वैदू, बेलदार, कैकाडी, माती वडार, गारुडी, कुंभार आदी समाज बांधवांचा समावेश आहे. गाढवांच्या खरेदी-विक्री बरोबरच ही मंडळी खंडोबाचे देवदर्शन आणि कुळधर्म करतात. सध्याच्या यांत्रिक युगात दगड, माती, मुरूम, सिमेंट पोती व अवजड साहित्य वाहून नेण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर केला जात असला, तरी गाढवांचे महत्त्व कमी झालेले नाही. उंच डोंगर, दऱ्यांमध्ये अडचणीच्या ठिकाणी वीट भट्टय़ांवर अजूनही गाढवांचा उपयोग केला जातो.
गाढव बाजारात व्यापारी जुनी पद्धत वापरताना दिसले. गाढवांचे दात बघून वय ठरवले जात होते. वेळप्रसंगी त्याला पळवून त्याची शारीरिक क्षमता तपासली जात होती. त्यानंतरच त्याच्या किमतीची बोली होत होती. दोन दातांचे गाढव दुवान, तर चार दातांचे चौवान, अखंड जवान कोरा आदी गाढवांचे प्रकार आहेत.
काठेवाडी जातीच्या गाढवांची ताकद जास्त असून ती एकावेळी ५० ते ६० किलोचा बोजा वाहून नेऊ शकतात. त्यामुळे त्यांना मागणी जास्त होती. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली गाढवे टेम्पो, ट्रक आदी वाहनातून त्यांच्या गावी नेली. सातारा, कराड, नगर, पुणे, सांगली, इंदापूर, बारामती, फलटण आदी भागांतून भटके विमुक्त समाज बांधव या यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणात आले होते. पूर्वी या यात्रेच्या निमित्ताने वैदू व भातु कोल्हाटी समाजाच्या पारंपरिक जातपंचायती भरत असत. परंतु, या जातपंचायतींना कायद्याने बंदी आल्याने त्या आता बंद झाल्या आहेत. मात्र, गाढव बाजार भरवला जातो.
गाढव बाजारासाठी मोठे पटांगण उपलब्ध व्हावे, या ठिकाणी पाणी, विजेची सुविधा मिळावी आदी मागण्या या वेळी समाजबांधवांनी केल्या. नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.