छोट काम…… शेखर रमेश शिरसाट

Share This Post

मी २५ वर्षांचा झालो होतो. सव्वीसावे वर्ष चालू झाले होते पण नोकरीचा काही पत्ता नव्हता. घरात मोठा भाऊ आणि वडील दोघेही सरकारी नोकरीला असल्यामुळे मी काही इतकं नोकरीच मनावर घेतलं नव्हतं. नाही म्हणायला तसे ७-८ interview दिले होते. पण आपल्या resume मधल्या academics चा गॅप बघून interviewer असा चेहरा करायचा कि तो मला नोकरीच काय पण भीक मागायला टोकरी पण देणार नाही. पण पाकिस्तान ला वर्ल्ड कप मध्ये भारताकडून हरण्याची जशी सवय झाली आहे, तशीच सगळ्या interviewer चे माझ्याकडे तसं बघणाऱ्या चेहऱ्यांची मला सवय झाली होती.

     नोकरी नसल्यामुळे दिवसभराचं schedule एकदम आरामशीर असायचं. वडिलांची बदली तासाभराच्या अंतरावर असलेल्या गावी होती. मग ८ वाजता त्यांचं आवरलं कि ते मला उठवायचे. मी त्यांना बस स्टॉप वर माझ्या bike ने सोडवायचो. त्यांच्याकडून खर्चायला पैसे मागायचो आणि सरळ सिगरेट ओढायला अड्ड्यावर जायचो. सकाळी सकाळी सिगरेटचा तो झुरका काळजात घर करायचा. खरंच घर करतोय “टार” च हे पण माहित होत. पण त्याकडे इतकं लक्ष द्यायचो नाही. असो, मग घरी जाऊन ब्रश करायचा आणि सोफ्यावर पाय ताणून, टीव्ही चा remote हातात घेऊन आईला एक कडक आवाज द्यायचा. “मम्मी चहा दे ग”. तोच दुसऱ्या मिनिटाला चहा आणि न मागता बिस्कीट पण यायची. ११ वाजे पर्यंत अंघोळ आटपून जेवण करायचं. वाटलं तर खूप साऱ्या (फेसबुक वर बनलेल्या) गर्लफ्रेंड्स पैकी एखादीला भेटायला जायचं. नाही तर आपल्या जिवाभावाचा एकुलता एक मित्र असलेल्या पिंट्या सोबत सिगरेट मारायला बाहेर पडायचं. दुपारी घरी येऊन झोप ठोकायची आणि संध्याकाळचा चहा झाला कि परत जायचं फुकायला.

खूप महिने असच चालू होत. त्या दिवशी नेहमी प्रमाणे मी सिगरेट ओढायला सकाळी सकाळी अड्ड्यावर गेलो. सिगरेट घेतली आणि ओढू लागलो. नगरपालिकेच्या लोटगाडी चा करकर आवाज माझ्या कानावर नेहमी प्रमाणे पडला. रस्यावर असलेली सगळी घाण, कचरा, तो नगरपालिकेचा कर्मचारी रोज साफ करायचा, तिथे पडलेले गुटख्याचे पाकीट, काडीपेटीच्या काड्या, चोकोलेटे चे रॅपर, सिगरेट च्या बट तो सगळं उचलून आपल्या लोट गाडीत टाकायचा आणि ते स्वच्छ करून निघून जायचा. खूप घाम घूम व्हायचा तो. मी त्याला नेहमी  बघायचो. तो खूप मेहनतीने काम करायचा. पण त्या दिवशी मी त्याच्या कामाला सिगरेट ओढतच बारकाईने पाहिलं. हा सगळा कचरा तर तो उचलतच होता. पण कुत्र्याने केलेली विष्ठा, लोकांनी थुंकलेला गुटखा, तंबाखू, लोकांचं उष्ट अन्न, सहज म्हणून थुंकलेलं सुद्धा तो साफ करत होता. त्याला कसलीही लाज वाटत नव्हती. त्याच्या कामात कुठलाही कंटाळा नव्हता. या आधी मी त्याला खूप वेळा पाहिलं होत. पण इतक्या बारकाईने कधीच पाहिलं नव्हतं. जितकं  व्यवस्थित घाण करणारे घाण करण्याचे काम करतात, ज्यात मी पण होतो तितकच व्यवस्थित कदाचित त्यापेक्षा जास्त व्यवस्थित पणे तो ते साफ करण्याचं काम करत असे. कित्येक वेळा त्याने मी पायाने रगडलेली सिगरेटची बट स्वतःच्या हाताने उचलून गाडीत टाकली होती पण तो एका शब्दाने मला कधीच बोलला नाही. आज पण त्याने माझी सिगरेट उचलून गाडीत टाकली आणि काहीच न बोलता निघून गेला. मी घरी पोहोचलो तरी त्याचाच विचार करत होतो. त्याची ती शांतता मला माझ्या कानशिलात मारलेली चपराक वाटू लागली. आज मी चहा पण मागितला नाही.  मम्मी चहा घेऊन आली आणि म्हणाली “काय झालं रे?” काही नाही झालं या अर्थाने मी मान हलवली. मी विचार करत होतो, एवढी घाण, एवढा कचरा तो माणूस कस काय उचलू शकतो. मी माझ्या घरातला पण कचरा फेकायला कधी जात नाही आणि तो माणूस रस्त्यावरचा कचरा जो लोकांनी केला तो स्वतः साफ करत होता. माझं मन कशातच लागत नव्हतं. गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झाल्या नंतर पण इतका मला त्रास झाला नव्हता, मी कधी इतका माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल पण विचार केला नसेल इतका मी त्या माणसाचा विचार करू लागलो. कारण इतकच की आपण केलेली घाण तो इतकी शांतपणे कशी साफ करतो. याबद्दल मला कुणाशी तरी बोलायचं होत. मी पिंट्याला फोन केला. पिंट्या घरीच होता. त्याला उचललं आणि सरळ आंटीच्या टपरी वर सिगरेट मारायला गेलो. पिंट्याला घडलेला प्रकार सांगितला. पिंट्या धूर सोडत सगळं ऐकत होता. माझं सगळं सांगून झाल्यावर पिंट्याने इतक्या फालतू पणे उत्तर दिल की माझी बोलतीच बंद झाली. पिंट्या म्हणाला, “अरे त्याला पैसे मिळतात त्याचे, भक्कम पगार मिळतो म्हणून तो साफ करतो उगाच कशाला कोणी लोकांची थुंकी साफ करेल?” पिंट्याने विचारलेल्या प्रश्नावर मी निरुत्तर झालो. माझ्याकडे बोलायला शब्द नव्हते. कारण पिंट्या फालतू पणे बोलला असला तरी खर बोलला. मी पण त्या गोष्टीशी सहमत झालो आणि विचार करणे सोडून दिले. दुसऱ्या दिवशी वडिलांना सोडवून पुन्हा तिथे सिगरेट मारायला गेलो. तो मनूस पुन्हा दिसला. सहजा-सहजी त्याच्या मेहनती बद्दल चा विचार मला सोडता येत नव्हता. त्याच्या कडे बघत मी विचार करत होतो आणि पिंट्याच्या फालतू प्रश्न वर मला उत्तर सापडले. मी पिंट्याला फोन लावला. आळशी लेकाचा (माझ्या सारखाच) गाढ झोपेत होता. मी त्याला बोलावलं पण तो येत नव्हता. शेवटी त्याला म्हटलं “अरे इथे दोन चिकण्या पोरी सिगरेट मारताय ये पटकन.” बापा पेक्षा झोप प्रिय असलेला पिंट्या पोरीचं नाव ऐकून १० मिनिटात पोहोचला. त्याने गाडी लावली आणि म्हणाला  “कुठंय पोरी?” मी त्याला शुशुशुशु असं केलं आणि त्या माणसाकडे बोट केलं. पिंट्या म्हणाला अरे डोळे फुटले का तुझे पोरी आणि पोरा मधला फरक कळत नाही का तुला? मी पिंट्याला त्याच्या कालच्या प्रश्नावर उलट प्रश्न केला, “तू करशील पैशा साठी अशी सफाई? उचलशील सिगरेटची बट? उचलशील कुत्र्याची विष्ठा? करशील साफ लोकांच्या थुंकी?” आज पिंट्या गप्प झाला. आम्ही घरी गेलो. त्या दिवशी मी विचार केला, जरी त्या व्यक्तीला त्या कामाचा भक्कम पगार मिळतो तरीही त्याने केलेलं काम छोटं नाहीये. इतरां सारखं फक्त फेसबुक च्या पोस्ट साठी किंवा पेपर मध्ये फोटो छापून आणण्यासाठी देखावा म्हणून त्याने हातात झाडू घेतला नव्हता. कुणाच्या फेसबुक पोस्ट वर त्याचे कौतुकास्पद फोटो पण कधी आले नसतील. त्याला ते खरंच मनापासून साफ करायचं होत म्हणून तो ते करत होता. ते त्याच काम होत.

मी अजूनही सिगरेट सोडली नाहीये पण ती संपल्यावर तिची बट रस्त्यात फेकत नाही. डस्टबिन मध्ये टाकतो. चॉकोलेटचे रॅपर सुद्धा डस्टबिन मध्येच टाकतो. रस्त्यात थुंकत नाही. कारण मला जणीव झालीय कि त्या कामासाठी संबंधित कर्मचाऱ्याला पैसे मिळत असले तरी आपण पैश्यासाठी लोकांनी केलेली घाण साफ करू शकत नाही. व्यसन हे वाईट असत, व्यसनाने आपल्या शरीराला हानी पोहोचते. पोहोचू देत. तुमचं शरीर आहे तुमचा प्रश्न आहे. तुम्ही पाहिजे तस त्या सोबत खेळू शकता. पण आपण केलेल्या व्यसनाचा त्रास दुसऱ्यांना का द्यायचा? आपण स्वतःच्या शरीराशी खेळता खेळता दुसऱ्यांच्या शरीराशी का खेळायचं? ते कर्मचारी हे काम करतात कारण त्यांचा परिवार त्यांच्यावर अवलंबून असतो. आपण केलेल्या अस्वच्छतेमुळे आपण त्यांच्या परिवाराचं पण नुकसान करतोय. का आपल्या व्यसनामुळे त्यांना हानी पोहोचवायची? ते त्यांचं काम आहे म्हणून? फक्त हातात झाडू असलेला फोटो, फेसबुक वर पोस्ट केला म्हणजे आपण अभिमानाचा काम केलं असं नाही. हातात झाडू घेऊन पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटो ची आपल्याला लाज वाटली पाहिजे कारण आपल्याला झाडू हातात घ्यावा लागला म्हणजे आपला देश किती अस्वच्छ आहे हे आपण दाखवतोय. झाडू हातात का घ्यावा लागतो? कारण आपण घाण करतो. घाण च केली नाही तर झाडू हातात घेण्याची गरज पडणार नाही. तुमचे व्यसन सुटत नसेल तर खुशाल चालू ठेवा पण तुमच्या व्यसनाचा त्रास दुसऱ्याच्या शरीराला होऊ देऊ नका. नगरपालिका कर्मचारी इतकं मोठं काम करताय. तर कचरा न करण्याचं छोट काम आपण नक्की च करू शकतो.

    

0 Reviews

Write a Review

admin

Read Previous

3D stage, LED walls, five lakh faithfuls, Novenas for Old Goa feast to begin from tomorrow

Read Next

Public meeting tomorrow at Azad Maidan to demanding resignation of CM

3 Comments

  • Very nice.. every single person is responsible for wastage and at last country is been named as poor India a country with so much of wastage. Nor the country but the citizens are responsible for it , one should understand it’s responsibility and should keep the place the city , the country clean, to make our own countries name as clean n beautiful India nor dirty India

  • Bharich

  • खूप सुंदर लेख भाऊ

Leave a Reply

%d bloggers like this: