सिंधुदुर्ग – खासदार विनायक राऊत हे अजूनही सी वर्ल्डला विरोध करत आहेत. सी वर्ल्ड होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली असून सिंधुदुर्गच्या विकासाला खीळ घालण्याचे काम ते करत आहेत.
अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केली. तसेच माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणार्या नवाब मलीक यांचाही त्यांनी निषेध केला.
येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सी वर्ल्ड प्रकल्प होणारच अशी भूमिका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी घेतली. त्यावर खासदार राऊत यांनी हा प्रकल्प होऊ देणार नाही असे खासदार श्री.राऊत बोलत आहेत.
खरं तर या प्रकल्पात कुठलंही प्रदूषण नाही. हजारो रोजगार संधी स्थानिकांना उपलब्ध होणार आहेत. पण या प्रकल्पाविरोधात स्थानिकांची माथी भडकविण्याचं काम राऊत करत आहेत. दरम्यान रोज पत्रकार परिषद घेऊन आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांची मानसिक स्थिती बरोबर नाही.
त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकही आरोप अथवा भ्रष्टाचार झाला नाही. मात्र आता मलीक हे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहेत. त्यांचा आम्ही निषेध करतो असे श्री.तेली म्हणाले.