कणकवलीत दारुड्या मुलाचा बापाने केला निर्घुण खून

0
185

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील कासार्डे आयरेवाडी येथे बापानेच मुलाचा खून केल्याची घटना ६ जानेवारीला मध्यरात्री २.३० वाजता घडली. त्यात मुलगा रवींद्र उर्फ पांडुरंग भिकाजी आयरे(३८) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी भिकाजी राघो आयरे (६५) याच्याविरोधात भा. द. वि. कलम ३०२ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासार्डेत बापानेच मुलाचा निर्घुण खून केल्याने खळबळ उडाली आहे.

मुलगा रवींद्र आयरे दररोज दारु पिऊन घरी येत वाद करत असे

कासार्डे येथील घरात मुलगा रवींद्र उर्फ पांडुरंग भिकाजी आयरे(३८) आणि वडील भिकाजी राघो आयरे (६५) वेगवेगळे राहत होते. मुलगा रवींद्र आयरे दररोज दारु पिऊन घरी येत वाद करत होता. रोज रोज भांडण करत असल्याने ही दुर्दैवी खुनाची घटना घडली आहे .मयत रवींद्र व त्याची पत्नी माहेरी देवगड तालुक्यातील गोवळ आंबेवाडी येथे रविवारी गेली होती. दोन दिवस राहिल्या नंतर मयत रवींद्र याने पत्नीला तू राहत असशील तर रहा, मी घरी जातो, असे सांगून तेथून तो मंगळवारी निघाला. बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचला. तेव्हा तो दारु पिलेल्या अवस्थेत होता. मयत रवींद्र आयरे घरी पोहोचल्यानंतर संशयित आरोपी भिकाजी आयरे यांना शिवीगाळ केली. दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यांच्या घराच्या अंगणातच मयत रविंद्र याला वडील भिकाजी आयरे यांनी बेदम डोक्यावर,मानेवर मारहाण केली. त्यात जागेवरच रवींद्र याचा मृत्यू झाला. संशयित आरोपी भिकाजी आपण दांड्याने मारहाण केल्याचे सांगत आहेत, तरीदेखील मानेला तोंडावर असलेल्या जखमा या कोणत्यातरी हत्याराने केलेल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मुलगा आपल्याला पाहत नाही याची खंत वडिलांच्या मनात होती

संशयित आरोपी हे काही शासकीय योजनांच्या मिळणाऱ्या अनुदानावर आपला उदरनिर्वाह करत होते. मुलगा आपल्याला पाहत नाही याची खंत त्यांच्या मनात होतीच, त्याबरोबर शिव्या आणि भांडणे त्याला कंटाळून त्यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. संशयित आरोपीने रात्री २.३० वाजता आपण मारहाण केल्याचे सांगितले आहे. डोक्याला मानेला व गालावर गंभीर जखमा आहेत. त्यानंतर जखमी अवस्थेत मयत रवींद्र हा अंगणातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. सकाळी ११ वाजता आरोपी भिकाजी आयरे याने शेजार्‍यांना आपला मुलगा मयत झाल्याचे सांगितले. शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर संशय आल्याने त्यांनी पोलीस पाटलांना कळवले. पोलीस पाटलांनी कणकवली पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी कणकवली पोलिसांचे पथक दाखल झाले. प्रथमदर्शनी खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार संशयित आरोपी म्हणून वडील भिकाजी राघो आयरे (६५) याना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात भादवि कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासऱ्यांच्या विरोधात सुनेने दिली पोलिसात तक्रार

दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून रवींद्र अहिरे याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.या प्रकरणी सासऱ्यांच्या विरोधात पत्नी रेश्मा रवींद्र अहिरे हिने तक्रार दिली आहे. घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खंडागळे व पोलीस निरीक्षक बापू खरात हेडकॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस हवालदार नितीन खाडे व पोलिसांचे पथक गेले होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मयत रवींद्र आयरे यांच्या पश्चात दोन भाऊ पत्नी अकरा वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here