अखेर इराणमध्ये अडकलेले ते युवक पोचले आपल्या मायभूमीत

0
161

 

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनाबाधित इराणमधील तेहरान हकिमेयीम या भागात महाराष्ट्र व गोवा येथील नऊ युवक अडकले होते. त्यात सावंतवाडी तालुक्यातील दोघांचा समावेश होता. 20 दिवसांपूर्वी ते आपल्या मायदेशी गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी ते आपल्या जन्मभूमीत परतले. गोवा राज्य सीमेपर्यंत त्यांना गोव्यातील खासगी वाहनाने सोडण्यात आले. जिह्याच्या सीमेत प्रवेश करताना ते भावूक झाले. आमदार नीतेश राणे यांच्यामुळेच आम्ही गावात येऊ शकलो, असे सांगत त्यांनी तरुण भारतचेही आभार मानले.

इराणमधील कोरोनाबाधित हकिमेयीम या भागात गोव्यातील जीकेबी हायटेक कंपनीमध्ये काम करण्यासाठी सिंधुदुर्ग व गोव्यातील नऊ युवक कंपनीच्या माध्यमातून गेले हेते. त्यात सावंतवाडी तालुक्यातील सागर पंडित (सातोसे-रेखवाडी), उदय पाटकर (वेत्ये- खांबलवाडी) यांच्यासह इतर सातजणांचा समावेश होता. कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांना भारतात परतायचे होते. मात्र, हवाई वाहतूक बंद होती. ‘तरुण भारत’ने त्यांची व्यथा 13 मार्चला मांडल्यानंतर त्याची दखल घेत भाजपचे युवा आमदार नीतेश राणे यांनी त्या युवकांशी संपर्क साधला. तसेच परराष्ट्र मंत्रालयांशी संपर्क साधत मदतीसाठी पुढे सरसावले होते. बऱयाच प्रयत्नानंतर भारतीय रेस्क्यू टीमच्या विमानाने त्यांना माघारी आणले. त्यांना भारत सरकारच्या गोवा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

अन् ते झाले भावूक…

वेत्ये खांबलवाडी येथील उदय पाटकर व सातोसे रेखवाडी येथील सागर पंडित हे युवक सुखरुप आपल्या जिह्याची सीमा ओलांडत असताना भावूक झाले. गोव्यातून पत्रादेवी सीमेपर्यंत त्यांना गोव्यातील वाहनाने सोडण्यात आले. तेथून घरी आणण्यासाठी नातेवाईक आले होते. तपासणी नाक्यावर त्यांची तपासणी करून काही सूचना करण्यात आल्या. जिह्यात प्रवेश करताना ते भावूक झाले. देवाची कृपा होती म्हणून आम्ही सुखरुप गावी पोहोचलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आमदार राणे यांचे त्यांनी आभार मानले.

आमदार राणेंचा शेवटपर्यंत पाठपुरावा

इराणमधून गोव्यात आल्यानंतर त्यांना गोवा येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे 15 हून अधिक दिवस झाल्यानंतर त्यांना गावी यायचे होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात पुन्हा 3 मेपर्यंत संचारबंदी जारी केल्यामुळे अडचण निर्माण झाली. दरम्यानच्या काळात या युवकांनी आमदार राणे यांच्याकडे कैफियत मांडली. त्यांनतर गोवा राज्य सरकार व महाराष्ट्र प्रशासनाशी आमदार राणे यांनी बोलून त्या युवकांना गावी येण्यास काही हरकत नाही. त्यांना रितसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केल्यावर त्यांचा गावात येण्याचा मार्ग मोकळा झाला. इराणमधून त्यांना मायदेशी आणण्यास आमदार राणे यांनी प्रयत्न केले होते. तर मायदेशी परतल्यानंतर त्यांनीच आम्हाला गावात येण्यासाठी खरी मदत केल्याचे मत त्या युवकांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here